Ladki Bahin Yojana Scheme 2025 : राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील महिलांना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र होळी आणि गुढीपाडवा सण होऊनही जवळपास महिना उलटला असतानाही दिंडोरी व पेठ तालुक्यातील लाभार्थी महिलांच्या हातात साड्या पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे अखेर या योजनेची अंमलबजावणी अक्षय तृतीयेला होणार आहे.
राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती. दिंडोरी तालुक्यातील १३ हजार १२७ लाभार्थिनींसाठी ८ एप्रिल रोजी साड्यांचा साठा तालुका गुदामात दाखल झाला.
१४ एप्रिलपर्यंत तालुक्यातील १७३ स्वस्त धान्य दुकानांपैकी ७३ दुकानांमध्ये ६ हजार ९५ साड्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १०० दुकानांमध्ये साड्या पोचवण्याचे काम सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार आणि तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिली.
दरम्यान, पेठ तालुक्यातील १० हजार ७८२ लाभार्थी महिलांसाठी ९ एप्रिल रोजी साड्या प्राप्त झाल्या असून, सध्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोहोचवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या साड्यांचे वाटप सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
मात्र, होळीच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेली ही योजना प्रत्यक्षात महिन्याभर उशिराने राबवली जात असल्याने लाभार्थी महिलांना होळीऐवजी अक्षय तृतीयेला साड्या मिळणार आहेत.
लाभार्थ्यांचे संतप्त प्रतिक्रिया
“शासनाने होळीच्या सणासाठी मोफत साड्या देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही वारंवार रेशन दुकानदारांकडे साड्यांबाबत विचारणा केली. मात्र महिना उलटूनही साडी मिळाली नाही,” अशी प्रतिक्रिया वणीतील लाभार्थी रोहिणी मोरे यांनी दिली.
प्रशासनाकडून हालचाल
तालुक्यात साड्या वितरित करण्यासाठी पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरु असून, स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना साड्या तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.