Pahalgam viral video: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror ) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील लोकांमध्ये संताप आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव गेला. या हल्ल्याच्या जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारताने देखील पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून पहलगाम हल्ल्यानंतर काही कठोर निर्णय घेतले आहेत.
सोशल मीडियावर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पहलगाममधील स्थानिक नागरिक पर्यटकांना मदत करत असल्याचे दिसून आले. आता असाच एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाने चिमुकल्याचा जीव वाचवल्याचे दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये मुलगा चिमुकल्या बाळाला घेऊन चालत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये गोळीबार होत असल्याचा आवाज येतोय. तर एक महिला ओरडत असल्याचे ऐकू येतंय. तसेच व्हिडीओमध्ये दिसणारा काश्मीरी मुलगा मी येतोय, असं महिलेला बोलताना दिसत आहे. व्हिडीओवर पहलगाम काश्मीर असं लिहिलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या मुलाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन-
काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे देण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता एनआयएनं देखील गुन्हा दाखल केला आहे. काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 400 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले.
कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी मानली जात आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली जात असून भारताला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिलाय. तर मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांनीही भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे.